मुंबईत कोरोना चाचणीबाबत आता नवे निकष

जाणून घ्या कुणाची चाचणी प्राधान्याने होणार?

Updated: Apr 16, 2020, 02:54 PM IST
मुंबईत कोरोना चाचणीबाबत आता नवे निकष title=

कृष्णात पाटील, मुंबई : कोविड-19 चाचणीबाबतच्या निकषांमध्ये आता मुंबई महापालिकेने बदल केला आहे. यापुढे सरसकट चाचणी करण्याऐवजी आता हाय रिस्क संपर्कात असलेल्या ज्या लोकांमध्ये कोविड-19 ची लक्षणे दिसतील, त्यांचीच चाचणी केली जाणार आहे. याआधी हाय रिस्क संपर्कातील सर्वांची सरसकट चाचणी केली जात होती.

बदल का केला?

हाय रिस्क संपर्कातील लोकांची चाचणी केल्यानंतर त्यापैकी बऱ्याच जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह येत होती. मात्र त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसून येत नव्हती. त्यातही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल, पण त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नसली तर त्याला वैद्यकीय उपचारांची गरज लागत नाही. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे काय ?

हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले लोक. एखाद्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्याच्या संपर्कात आलेले कुटुंबातील लोक, जवळचे लोक किंवा कोणत्याही कारणाने रुग्णाच्या संपर्कात आलेले लोक यांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतात.

हाय रिस्क संपर्कातील लक्षणे नसलेल्या लोकांचे काय करणार?

हाय रिस्क संपर्कात आलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी होणार नसली तरी त्यांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर लक्ष ठेले जाणार आहे. आणि एखाद्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली तर त्याची चाचणी केली जाणार आहे.

महापालिकेच्या निर्णयामुळे लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना प्राधान्याने उपचार केले जातील. तसेच रुग्ण संख्याही कमी होईल. पण हाय रिस्क संपर्कातील लोकांना योग्य पद्धतीने क्वारंटाईन करावं लागणार आहे.

यांना नवे निकष लागू नाहीत

महापालिकेनं कोरोना चाचणीसाठी नवे निकष अंमलात आणून कोरोनाची लक्षणे असलेल्यांचीच चाचणी करण्याचे ठरवले असले तरी पुढील लोकांना यातून वगळले आहे. या लोकांची चाचणी प्राधान्याने करण्यात येणार आहे.

१. ३४ आठवड्यांवरील गरोदर महिला (संभाव्य प्रसुतीच्या दोन महिने आधी)

२. डायलॅसिसचे रुग्ण

३. केमोथेरपी सुरु असलेले रुग्ण

४. कोविडशी संबंधित असलेले आरोग्य सेवक कर्मचारी

कोरोना रुग्णांची सध्या काय स्थिती?

राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. १८ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. तर २ टक्के रुग्णांची तब्बेत गंभीर आहे.

 

मुंबई महापालिका प्रशासनाने आदेश काढून याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांच्या अधिकाधिक टेस्ट करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून त्यामुळे गरज असलेल्यांनाच वैद्यकीय सुविधा प्राधान्याने मिळतील.