कोविड केअर सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवी नियमावली

औरंगाबादमध्ये डॉक्टराकडून महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न 

Updated: Mar 5, 2021, 09:00 AM IST
कोविड केअर सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवी नियमावली title=

मुंबई : औरंगाबादमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center Women Safety) एका महिला रुग्णावर डॉक्टराने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महिला कोविड सेंटरमध्येही सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं. त्याला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड केअर सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

काय म्हणाले उपमुख्यमंत्री? 

राज्यातील प्रत्येक महिला सुरक्षित असलीच पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी 31 मार्चपर्यंत एसओपी तयार करून लागू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

विधान भवनात घटनेचे पडसाद

रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा आमदार मनीषा चौधरी यांनी उपस्थित केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. अशा व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे सरकारला गांभीर्य आहे का? असा प्रश्न करीत सरकारने भूमिका स्पष्ट करीत कोविड सेंटरसाठी एसओपी लागू करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. (औरंगाबादमध्ये डॉक्टरचा अतिप्रसंग; विधानसभेत गदारोळ) 

 

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. पीडित महिलेचे नाव गुपित ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.