अक्षय घुगे, झी २४ तास मुंबई : पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा आताच डोळेभरून पाहून घ्या.... परत तुम्हाला हे दृश्यं पाहायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही. कारण येत्या काही वर्षात कार पेट्रोल आणि डिझेलला टाटा बायबाय करणार आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपांना कायमचं टाळं लागण्याची शक्यता आहे.
येत्या काही वर्षांत भारतातच्या पेट्रोल पंपाना कायमचं टाळं ठोकावं लागणार आहे. कारण येत्या काळात कारला पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जाण्याची गरजच लागणार नाही. भारतीय बाजारपेठेत कार उत्पादक कंपन्यांनी नवनव्या ई-कार लॉन्च करण्यास सुरुवात केलीय.
टाटा कंपनीनं ई- व्हिजन कार बाजारात आणण्याची तयारी केलीय. ही कार एकदा चार्ज केली की ती १ हजार किलोमीटर धावणार आहे. ह्युंदाई कंपनीची ही कार एका वेळी चार्ज केल्यावर ४५२ किलोमीटर धावणार आहे. ई-कार असल्या तरी त्यांचा लूक आणि त्यांच्या वेगाशी कुठंही तडजोड करण्यात आलेली नाही. ई- कारचा चार्जिंगचा वेळही कसा कमी होईल याकडं कार उत्पादक कंपन्यांची विशेष लक्ष दिलंय. त्यामुळं कार पाहून आता तुझी कार किती अॅव्हरेज देते? हा प्रश्नही कालबाह्य होणार आहे.
बाजारात येऊ घातलेल्या कारची किंमत थोडी जास्त असली तरी जेव्हा मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढेल तेव्हा या कारच्या किंमती सामान्य लोकांच्याही आवाक्यात येतील.
ई-कारमुळे पेट्रोल आणि डिझेल आयातीमुळे परदेशात जाणारा अब्जावधी रुपयांचं चलन भारतात राहणार आहे. शिवाय पर्यावरणाची हानीही होणार नाही. एकदा का या कार भारतीयांच्या अंगवळणी पडल्या की पेट्रोलपंप चालकांना पेट्रोलपंपांच्या जागी दुसरं दुकान उघडावं लागणार आहे. त्यामुळं या नव्या बदलाला तुम्ही तयार राहा