कँटीनमधील उसळ पाव खाल्ल्याने पालिकेच्या नऊ अधिकाऱ्यांना विषबाधा; एकाची प्रकृती चिंताजनक

उसळ-पाव खाल्ल्यानंतर या सर्वांना मळमळायला लागले व त्यानंतर उलट्या झाल्या.

Updated: Jan 31, 2019, 06:50 PM IST
कँटीनमधील उसळ पाव खाल्ल्याने पालिकेच्या नऊ अधिकाऱ्यांना विषबाधा; एकाची प्रकृती चिंताजनक title=

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नऊ अधिकाऱ्यांना गुरुवारी विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. हे सर्व अधिकारी पालिकेच्या ब वॉर्डमधील असून यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. आज दुपारी साडेचार वाजता हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, पालिकेच्या उपहारगृहातील उसळ-पाव खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाल्याची शक्यता आहे. उसळ-पाव खाल्ल्यानंतर या सर्वांना मळमळायला लागले व त्यानंतर उलट्या झाल्या. यानंतर या सर्वांना तातडीने जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी एका अधिकाऱ्याची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या अधिकाऱ्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित आठ जणांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.