नितीन देसाईंनी का केली आत्महत्या? गृहमंत्र्यांनी केली सखोल चौकशीची घोषणा

ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी सरकार करणार आहे. आत्महत्येआधी त्यांनी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती समोर आलीय.. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे? त्यातून त्यांच्या आत्महत्येचं गूढ उकलेल का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. 

Updated: Aug 3, 2023, 10:06 PM IST
नितीन देसाईंनी का केली आत्महत्या? गृहमंत्र्यांनी केली सखोल चौकशीची घोषणा title=

Nitin Desai Suicide : बॉलिवूडच्या सिनेमांपासून ते टीव्ही मालिकांपर्यंत आणि राजकीय सभांपासून गणेशोत्सव मंडळांच्या सजावटीपर्यंत भव्यदिव्य, दिमाखदार सेट उभारणारे नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येमुळं (Suicide) सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. गळफास घेतल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून (Postmortem Report) स्पष्ट झालंय. कर्जबाजारीपणामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. त्यांच्या मृत्यूचे विधानसभेतही पडसाद उमटले. तेव्हा आत्महत्येच्या सखोल चौकशीची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येपूर्वी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्याची चर्चा आहे. त्या ऑडिओ क्लिपमधून आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.

11 ऑडिओ क्लिपमध्ये दडलंय काय? 
लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) माझा अखेरचा प्रणाम, असा उल्लेख त्यात आहे. 4 उद्योजकांची नावंही त्यात असल्याचं समजतंय कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी आर्थिक फसवणूक केली आणि वसुलीसाठी छळ केला, असंही त्यांनी म्हटलंय. एनडी स्टुडिओ नितीन चंद्रकांत देसाईनं नाही, तर एका मराठी माणसानं उभा केलेला कलामंच आहे. एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडं जाऊ नये. त्याऐवजी राज्य सरकारनं एनडी स्टुडिओ ताब्यात घ्यावा आणि नव्या कलावंतांना भव्य कलामंच उपलब्ध करून द्यावा, असा उल्लेखही त्या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं समजतंय. दरम्यान, एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याचा मुद्दा विधानसभेतही उपस्थित झाला, तेव्हा कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं.

भारतातला अव्वल कलादिग्दर्शक 
नितीन चंद्रकांत देसाई यांची भारतातील अव्वल कलादिग्दर्शक अशी ओळख होती. 1942 Love Story सिनेमापासून नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. लगान, देवदास, जोधा अकबर अशा एकाहून एक चित्रपटांमधल्या भव्य दिव्य सेटचे बॉलिवूडमध्ये नवे बेंचमार्क सेट केले.  इतकंच नाही तर काही हॉलिवूड सिनेमांसाठीही त्यांनी योगदान दिलं. प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथांचं कलादिग्दर्शनही चंद्रकांत देसाईच करायचे. प्रसिद्ध लालबागच्या राजाचा सेटही नितीन चंद्रकांत देसाईच उभारायचे. 

नितीन चंद्रकांत देसाईंच्या आत्महत्येमुळं वित्तीय संस्थांकडून सक्तीनं होणाऱ्या कर्जवसुलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. देसाईंच्या डोक्यावर तब्बल 250 कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार होती, अशी माहिती समोर आलीय.  मात्र सिनेसृष्टीपासून बड्या राजकारण्यांपर्यंत मोठमोठ्या ओळखी असलेल्या एवढ्या मोठ्या कलावंताला कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या करावी लागत असेल, तर ही कला आणि संस्कृतीप्रेमी महाराष्ट्रासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.