चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरमधील (Ulhasnagar Crime) राष्ट्रवादीच्या (NCP) माजी आमदाराच्या स्वीय सहाय्यकाने मंगळवारी पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नंदू ननावरे (Nandu Nanavare) आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येनंतर उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला दोघांच्या आत्महत्येचे कारण समोर आले नव्हते. मात्र आता दोघांच्या आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी नंदू ननावरे यांनी एक व्हिडीओ शूट केला होता. आता हा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी (Ulhasnagar Police) याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नंदू ननावरे यांनी पत्नीसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत मंगळवारी आत्महत्या केली होती. आता या प्रकरणी ननावरे पती पत्नीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करून साताराच्या पलटण येथे राहणारे संग्राम निकाळजे याने दिलेल्या त्रासाबद्दल सांगितले आहे. आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे ननावरे म्हणाले. यासाठी मोठ्या नेत्याचीही मदत घेतली जात असल्याचे ननावरे यांनी म्हटलं आहे. आत्महत्या केल्यानंतर ननावरे यांच्या खिशात चिट्ठी सापडली त्यात देखील निकाळजे याच्या नावाचा उल्लेख केला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संग्राम निकाळजे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. यासोबत या व्हिडीओची सत्यता पडताळून पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. यामध्ये काही राजकीय नेत्यांच्या सहभाग आहे का हे देखील तपासले जाणार आहे. ननावरे यांचे मंत्रालयातील काही राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते अशीसुद्धा माहिती समोर आली आहे. नंदू ननावरे हे राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी, ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक होते.
काय आहे आत्महत्येपूर्वीच्या व्हिडीओमध्ये?
"फलटण येथील संग्राम निकाळजे काही दिवसांपूर्वी अंबरनाथ येथे आला होता. इथल्या काही राजकीय व्यक्तींना संपर्क करुन मला आणि माझ्या कुटुंबाला वेगवेगळ्या पद्धतीने छळण्याचा प्रयत्न केला. मला आणि माझ्या पत्नीला खोट्या प्रकरणामध्ये अडवण्याचे षडयंत्र रचले. माझे वकीलही समोरच्या पक्षाला मॅनेज झाले. आमची केस वर्षानुवर्षे तशीच ठेवली. आमच्या घराशेजारी राहणारा त्यांचा पुतण्या आणि वकिलाने मिळून संग्राम निकाळजे आणि त्यांच्या समर्थकांनी आमचे कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. याबाबत योग्य ती कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावी. संग्राम निकाळजे आणि त्याला मदत करणारे आमच्या मृत्यूला जबाबदार आहेत," असे ननावरे पती पत्नी म्हणताना दिसत आहे.