मुंबई : शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन. राज्यात तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदावर विराजमान असले तरी कोरोना संकटामुळे यावर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा जल्लोष नसेल. त्याऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत, असं आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता झूम अँपद्वारे शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पक्ष पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरू असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामुहिकरित्या साजरा होणार नाही. शिवसेना शाखेत आधी पासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. तसंच इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेनं गेल्या ५४ वर्षात महाराष्ट्रासह देशभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. १९९५ च्या युती सरकारनंतर आज २५ वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे. त्यामुळे या वर्षी शिवसेनेनं मोठ्या जल्लोष सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं होतं. मात्र कोरोना विषाणुंच्या संसर्गामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व शिवसैनिकांना आता या काळात शंभर टक्के समाजकारण करण्याचा आदेश दिला आहे. ५४ वर्षांच्या शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भात आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तसेच शिवसेना नेते, मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना वंदन केलं आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहील, असा विश्वास वाटतो. वर्धापनदिनाच्या सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.