अवजड वाहनं आणि बसना मुंबईत या वेळेत प्रवेश बंद

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.

Updated: Sep 13, 2017, 05:24 PM IST
अवजड वाहनं आणि बसना मुंबईत या वेळेत प्रवेश बंद title=

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. आता याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने शहरात येणा-या अवजड वाहने आणि खासगी बसेसना मंगळवारपासून मुंबईत प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबईत सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० पर्यंत ही प्रवेशबंदी असेल. याचा मोठा फटका मालवाहतूकीपेक्षा मुंबईतून बाहेर जाणा-या आणि बाहेरुन मुंबईत येणा-या खासगी बसेंना बसणार असल्याचं बोललं जातंय.

दक्षिण मुंबईत सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना तसंच प्रवासी वाहतूक करणा-या खाजगी बसेना प्रवेश बंदी करण्यात आलीय. हा प्रयोग पुढील दोन महिने करण्यात येणार आहे. मुंबई शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढ असून त्यातच मेट्रोसह विविध मोठ्या प्रकल्पांचं काम सुरु आहे. त्यात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होतेय. या निर्णयामुळे मुंबईतील ट्रॅफिकची समस्या काही अंशी कमी होईल असा विश्वास वाहतूक विभागाला आहे.