मुंबई : सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी कोणतीही चूक केलेलनी नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदलाचा कोणताही प्रस्ताव सध्या पक्षासमोर नसल्याचंही त्यांनी सांगितंल. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फेरबदलाचे संकेत दिले आहेत. फेरबदलाचा निर्णय सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्रीच घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्या सरकारमधील हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे.
सचिन वाझे प्रकरणी सरकारला कोणतीही अडचण नाही, सरकार भक्कम आहे असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, विरोध करणे हे त्यांचे कामच आहे, 2020 साली नियमानुसार सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं स्पष्टीकरण देखील देसाई यांनी दिलं आहे.
सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली होती.
महाराष्ट्रात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आज दिवसभर वर्षावर भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई गुन्हे सहआयुक्त मिलिंद भारंबे, कायदा सूव्यवस्था सह आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परबही या बैठकीला उपस्थित होते. त्याआधी पवार आणि मुख्यमंत्र्यांची अर्धा ते पाऊण तास बैठक झाली.
बातमीचा व्हिडिओ