धारावीतून कोरोनाबाबतची दिलासादायक बातमी

अतिशय धोक्याचा ठरलेल्या धारावी भागातून आता.... 

Updated: Jun 8, 2020, 03:10 PM IST
धारावीतून कोरोनाबाबतची दिलासादायक बातमी
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसची दहशत देशभरात जसजशी पसरत गेली तसतसा स्वप्ननगरी मुंबईचा धोका आणखी वाढत गेला. सर्वात मोठं झोपडपट्टी क्षेत्र असणाऱ्या धारावी भागामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं मोठी आव्हानं उभी करुन गेला. पण, अखेर कोरोनाशी सुरु असणाऱ्या या युद्धात आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि अर्थातच कायदा आणि सुव्यवस्था राखून ठेवण्यासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस यंत्रणांच्या वाट्याला काही अंशी यश आल्याचं चित्र आहे. 

कोविड 19 चे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यामुळं अतिशय धोक्याचा ठरलेल्या धारावी भागातून आता काहीशी दिलासादायक माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात रुग्णांचं कोरोनातून सावरण्याचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढत आहे. तोच मुंबईतही आता कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात घट झाल्याची माहिती उघड होत आहे. इतकंच नव्हे, तर मागील आठवडाभरात कोरोनावाढीचं मुंबईतील प्रमाण पाहिलं असता य़ामध्ये धारावीतील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं लक्षात येत आहे. 

वाचा : सोने-चांदी दरात वाढ; काय आहे आजचा भाव

 

३० मे ते ७ जूनपर्यंतच्या कालावधीचा आढावा घेतला असता यादरम्यानच्या काळात कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही आहे. शिवाय दर दिवशी रुग्णसंख्या वाढीचा उंचावता आलेखही आता काहीसा कमी होऊ लागला आहे. त्यामुळं हा नक्कीच एक दिलासा ठरत आहे. आतापर्यंत धारावीमध्ये कोरोनावाधितांचा आकडा १९१२ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये ७१ जणांचा कोरोनामुळं मृत्यूही झाला आहे.. 

प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न 

धारावीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या भागामध्ये सर्वतोरी यंत्रणा लागू करत प्रशासनाकडून शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात आल्या. शिवाय येथून अनेक मजुरांनी आपल्या मुळ गावची वाटही धरली. प्राथमिक पातळीवर चाचणी करत गरजेनुसार येथील नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. परिणामी या भागातून कोरोना रुग्णांची झपाट्यानं होणारी वाढ बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

फक्त प्रशासनच नव्हे, तर अनेर स्वयंसेवी संस्था आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या मंडळींनीसुद्धा या भागामध्ये असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊऩ आणि क्वारंटाईनच्या कालावधीत मोलाची मदत केल्याचं पाहायला मिळालं होतं.