मुंबई : सामान्य महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत उद्या राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, व्यापारी, खासगी कार्यालये आणि मॉल्स यांच्या संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुंबईतल्या लोकल सेवा सुरू करण्याबाबत पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. तसेच खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सर्व महिलांना उद्यापासून लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा केली. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत लोकलमधून प्रवास करु शकतात, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020
नवरात्रीनिमित्ताने सर्वच महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहिले होते. मात्र, रेल्वेकडून त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे मंडळाला पत्र लिहिले होते. नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी राज्य सरकारने सामान्य महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचे परिपत्रक जारी केले होते. मात्र रेल्वेने यासंदर्भातली संमती नाकारली होती. त्यामुळे महिलांचा लोकल प्रवास लांबला होता.
कोरोना काळात नोकरी करणाऱ्या महिलांना मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सामान्य महिलांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची घोषणा केली होती. मात्र, रेल्वेने खोडा घातला होता. त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वेला विनंती करणारे पत्र आज पाठवले होते. त्याची दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे आता महिलांना राज्य सरकारने मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे. आता सगळ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याबाबत उद्या चाचपणी घेण्यात येणार आहे.