आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार

मराठी भाषेला (Marathi Bhasha) अभिजात दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Updated: Feb 27, 2020, 05:09 PM IST
आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार
Pic Courtesy : Ajit Pawar, twitter

मुंबई : मराठी भाषेला (Marathi Bhasha)  अभिजात दर्जा (Marathi language elite status ) मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. विधानभवन परिसरात मराठी भाषेचा जागर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा खाद्य महोत्सवाला गर्दी का जास्त असते याचा विचार करायला हवा, असा टोलाही लगावला. दरम्यान, मराठी भाषा दिन साजरा करत असताना, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही यानिमित्ताने दिली.

भाषा टिकायची असेल तर...

कुठलीही भाषा टिकायची असेल तर, त्या भाषेत पोट भरण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. त्यासाठी ती भाषा व्यापार, उद्योग आणि संगणकाची भाषा असली पाहिजे. आपली मराठी भाषा, ही उद्योजकांची भाषा व्हावी यासाठी, शासनासोबतच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. मराठी साहित्य, नाटक आणि सिनेमांमध्ये सध्या होत असलेले नवे प्रयोग कौतुकास्पद आहेत.वेगळे विषय हाताळले जात आहेत. अनेक विक्रम मोडीत काढणारा, सरकारने टॅक्स-फ्री केलेला 'तान्हाजी' सिनेमा, अक्षय इंडीकर सारख्या तरुण दिग्दर्शकाचे चित्रपट आज जगभर नावाजले जात आहेत, ही आपल्यासाठी अभिमानस्पद बाब आहे, असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

विधेयक विधानसभेतही आजच मंजूर?

इयत्ता पहिली ते दहावी तसेच सर्व प्रकारच्या बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्याबाबतचे विधेयक विधानपरिषदेत मंजूर झाले आहे. हे विधेयक सर्व सभासद आणि मान्यवरांच्या एकमतानं विधानसभेतही आजच मंजूर होईल. दरम्यान, अधिवेशनात आज चौथ्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव मांडला जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हा ठराव मांडणार असून तो मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. दुसरीकडे विधानभवनाच्या आवारात मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.