महापालिकेच्या LED स्क्रीनवर लावला अश्लील व्हिडिओ; आरोपीला पाहून पोलिसांनाही धक्का

Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या एलईडी स्क्रीनवर चक्क अश्लील व्हिडीओ लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने हा व्हिडीओ लावल्याचे समोर आलं आहे.

चंद्रशेखर भुयार | Updated: Feb 1, 2024, 02:19 PM IST
महापालिकेच्या LED स्क्रीनवर लावला अश्लील व्हिडिओ; आरोपीला पाहून पोलिसांनाही धक्का title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने लावलेल्या एलईडी स्क्रिनवर चक्क अश्लील व्हिडिओ लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या प्रकाराबाबत सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय.दरम्यान एका अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आता चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

उल्हासनगर महापालिकेने या एलईडी स्क्रीन पालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी लावले आहेत. मात्र कॅम्प नंबर दोन परिसरात गोल मैदान लावलेल्या एलईडी स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यानंतर तिथून जाणाऱ्या नागरिकांना मान खाली घालून जावे लागले. काही वेळ हा व्हिडिओ तसाच सुरू होता.

हा संपूर्ण प्रताप एका अल्पवयीन मुलाने केल्याचे सांगितलं जात आहे. मात्र हे एलईडी स्क्रीन नेमके कुठून ऑपरेट होतात, तिथे हा अल्पवयीन कसा आला असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान जोपर्यंत या घटनेचा उलगडा होत नाही तोपर्यंत हे स्क्रीन बंद ठेवावेत आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतीय.

"सपना गार्डन परिसरात महापालिकेने एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. माझ्या माहितीनुसार, शहरात आठ ठिकाणी अशा स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. यावर महापालिकेच्या राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. पण सपना गार्डन परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर अश्लिल व्हिडीओ सुरु झाला. त्यानंतर लोकांचे फोन येण्यास सुरुवात झाली. मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. त्यानंतर कुणीतरी हे हॅक केल्याचे समोर आलं आहे. हॅक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. भविष्यात याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात. यामुळे वातावरण बिघडू शकतं. महापालिकेने यावर लक्ष ठेवायला हवं," असे माजी नगरसेवक मनोज लासी यांनी म्हटलं.