मुंबई : फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे विक्रोळी येथील एका डॉक्टराला चांगलेच महागात पडले आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फेसबूकवर धार्मिक आणि जातीयवादी तेढ निर्माण करण्याच्या प्रकरणात विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी डॉ. सुनीलकुमार निषाद याला अटक केली होती.
निषाद हा विक्रोळी पार्कसाईट विभाग रहातो आणि याच विभागात त्याचे एक क्लिनिक देखील आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या फेसबूक वॉलवरून हिंदू धर्म, हिंदू देवता आणि एका समाजाबाबत अतिशय टोकाची टीका करणाऱ्या पोस्ट टाकत होता. यामुळे विभागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. वारंवार या डॉक्टरला समजावण्यात आले होते. त्यानंतर देखील त्याच्या समाजात तेढ पसरविणाऱ्या पोस्ट टाकणे सुरुच होते. याच विभागातील सामाजिक कार्यरत रवींद्र तिवारी यांनी विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात ११ तारखेला तक्रार दिली होती. त्यानुसार या डॉक्टरवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर या डॉक्टरने क्लिनिक बंद ठेवले आणि तो फरार झाला.
फरार झाल्यानंतर तो फेसबूकवर अशा पोस्ट टाकत होता. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी काल त्याला फोर्ट परिसरातून अटक केली. आज न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. परंतु या डॉक्टरावर कठोर कारवाईची मागणी तक्रारदार यांनी केली आहे.