बाबांनो, तुम्हीही कधीतरी म्हातारे होणारच आहात...!

१५ जून हा जागतिक जेष्ठ नागरीक जागृकता दिवस म्हणून पाळला जातो

Updated: Jun 15, 2018, 01:07 PM IST
बाबांनो, तुम्हीही कधीतरी म्हातारे होणारच आहात...! title=

सचिन गाड, झी मिडिया, मुंबई : आयुष्याचे अनेक टप्पे असतात... लहानपणी जशी सगळ्यांनाच प्रेम आपुलकीची गरज असते, तशीच त्याची गरज ही उतार वयातदेखील भासते... मात्र त्याच वयात अनेकांच्या पोटी हालअपेष्टा येते... जे त्यांचे आपले असतात त्यांनाच बरोबर आपण नकोशे होऊन बसतो आणि मग आयुष्यच नकोस वाटायला लागतं. आपल्या देशात २५ टक्के जेष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या जाचाला सामोरे जावं लागतं हे वास्तव आहे. 

जेष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या 'हेल्प एज इंडिया'च्या कार्यक्रमात बसलेल्या या जेष्ठ नागरीकांना बघितलं, त्यांची कहाणी ऐकली तर वास्तव अस्वस्थ करतं. प्रत्येकालाच त्यांची मुलं त्यांच्या सुना त्रास देतायेत हे समजून येईल, पण हे प्रमाण मोठं आहे. देशातील २५ टक्के जेष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या जाचाला सामोरं जावं लागतयं ही सत्य परिस्थिती आहे. 

१५ जून हा जागतिक जेष्ठ नागरीक जागृकता दिवस म्हणून पाळला जातो. त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अभिनेत्री शमीता शेट्टी हीदेखील उपस्थित होती. जेष्ठ नागरिकांची अवस्था बघून तिला देखील  मोठा धक्का बसला 
  
७२ वर्षीय लिलाबई माने या गिरगावात रहातात. घर स्वत:च असून देखील आज त्या आपल्याच घरात परक्या झाल्या आहेत. घरी मुलगा मारतो, सून छळ करते म्हणून त्यांना घराबाहेर झोपावं लागतं. या वयात घराबाहेर पडून राबण्याची वेळ लिलाबाईंवर आली आहे. सकाळी लिलाबई बेबी सिटींगचं काम करतात. त्यातुन जे काही थोडे पैसे मिळतात त्यातुन त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 
 
तरूणांचा देश अशी खरं तर भारताची ओळख. येथे तरूणांची संख्या सगळ्यात जास्त आहे. मात्र जशी वर्ष सरतील तसं मात्र हे चित्र बदलणार आहे... एका सर्व्हेमध्ये समोर आलं आहे की २०५० पर्यंत भारताची ५० टक्के लोकसंख्या ही जेष्ठ नागरिकांची असेल. 'ओल्ड एज होम' सुरू करून हा प्रश्न सुटणारा नाही तर त्यासाठी प्रत्येकाला जाणीव करून देण्याची गरज आहे की आज ना उद्या तोदेखील जेष्ठ नागरिकच होणार आहे. त्यामुळं ज्येष्ठांप्रती आदर बाळगा. त्यांची काळजी घ्या... त्यांचा सन्मान करा...