मुंबई : शेतक-यांच्या नावावर परस्पर लाखो रुपयांचं कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणी, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या शेतक-यांनी मंद्रूप इथे रस्ता रोको आंदोलन केलं.
सहकार मंत्री देशमुख यांच्या लोकमंगल समूहाचा भडारकवठे इथे लोकमंगल कारखाना आहे. या कारखान्यानं कुसूरचे शेतकरी गजानन बिराजदार यांच्या नावे, परस्पर तीन लाखांचं कर्ज पुण्यातल्या कासारवाडी इथल्या युनियन बँक ऑफ इंडियामधून काढलं. त्याबाबत जाब विचारताच कारखान्यानं कर्जाची रक्कम भरली.
येळेगावमधले शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावे, कॅनरा बँकेच्या सोलापूर शाखेतून कारखान्यानं १५ लाखांचं कर्ज उचललं. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार करुनही कारखान्याचे आजीमाजी अध्यक्ष आणि संचालकांवर आज पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी विजापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरच्या मंद्रूप इथे रस्ता रोको आंदोलन केलं.