मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपले मौन सोडणे ही खूपच आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनादिवसानिमित्त ब्लॉगद्वारे आपले विचार मांडले होते. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही, असे या ब्लॉगमध्ये म्हटले होते. त्यामुळे गेल्या बऱ्याच काळापासून पक्ष संघटनेत अडगळीत पडलेल्या अडवाणी यांनी भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. अडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
चौकशीच्या तलवारी केवळ टांगत्या ठेवून भ्रष्टाचार कसा संपवणार; शिवसेनेचा मोदींना सवाल
तसेच या अग्रलेखातून संविधानाचा गळा घोटला जात असल्याची ओरड करणाऱ्या विरोधकांनाही खडे बोल सुनावण्यात आले आहेत. आमची सत्ता आली तर चौकीदारास तुरुंगात टाकू, असे जाहीरपणे बोलणे व त्यानंतरही मुक्त फिरणे हे काही देशात व्यक्तिस्वातंत्र्य संपूर्ण संपल्याचे लक्षण नाही. विरोधकांनी नैतिकता, धैर्य व एकवाक्यता दाखवली तर सत्ताधारी बेबंद वागणार नाहीत. अडवाणी यांनी त्यांची भूमिका मांडली, पण विरोधकांत आज आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे. मात्र त्याचे खापर ते मोदींवर फोडत असल्याचे सांगत शिवसेनेने विरोधकांना लक्ष्य केले आहे.