Maharashtra Politics : शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर मविआचं काय होणार? हाच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे. महाविकास आघाडीचं भवितव्यच धोक्यात आल्याचं चित्र आहे. अशातच शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या मोळाव्यात पवारांनी उद्धव ठाकरे यांना साद घालत एकत्र निवडणूक लढण्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढली तर वेगळं चित्र दिसेल असा आशावाद पवारांनी व्यक्त केलाय.
पवार काय म्हणाले?
शिवसेनेतलं बंड सामान्य शिवसैनिकाला रूचलेलं नाही. फुटलेल्या 40 आमदारांमधील एक-दोन अपवाद वगळता एकही निवडून येणार नाही.
त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर वेगळं चित्र दिसेल असं पवार म्हणाले.
विशेष म्हणजे पवारांच्या आवाहनानंतर शिवसेनेकडून लागलीच प्रतिसाद मिळणं अपेक्षित होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी मंगळवारी घेतलेल्या माजी आमदारांच्या बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चकार शब्दही काढला नाही. तिकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय.
शिवसेनेच्या भूमिकेवर काँग्रेस नाराज
शिवसेना महाविकास आघाडीत आहे. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना शिवसेनेनं काहीही चर्चा केलेली नाही.
शिवसेनेनं घेतलेली स्वतंत्र भूमिका आणि काँग्रेसच्या नाराजीमुळे शरद पवारांनी सावध पवित्रा घेतलाय. कुणी सोबत येईल याचा विचार न करता कामाला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
पवारांचा स्वबळाचा नारा ?
- कोण आपल्यासोबत येईल, याचा विचार करू नका
- महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा
- दर वीस दिवसांनी वॉर्ड अध्यक्षांनी रिपोर्ट द्यावा
- कार्यकर्त्यांनो, घराघरांत पोहचा..असा आदेशच पवारांनी दिलाय.
मविआत सारंकाही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी चित्र मात्र वेगळंच दिसतंय. उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षांना विश्वासात न घेताच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे सत्तेसाठी जन्माला आलेल्या महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पवार पॉवरफुल्ल होण्याच्या तयारी असताना मविआ पॉवरलेस होतीय का ? असा प्रश्न निर्माण झालाय.