NCP MLA Travel in CM Eknath Shinde Car: कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण चांगलेच तापल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही जागांवरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) मतभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिन्ही पक्षांनी या जागा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये यासंदर्भातील मोठा निर्णय येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) कारमधून प्रवास करताना दिसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा हा प्रवास पुण्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार (Pimpri NCP MLA) अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून मंत्रालय ते ठाणे प्रवास करताना पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा असल्याने या प्रवासामागील नेमकं कारण काय याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
अण्णा बनसोडे यांच्या मुलाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे.
मधल्या काळात अण्णा बनसोडे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा पुणे आणि पिंपरीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवाय बनसोडे हे अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना सुद्धा गैरहजर होते. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा मुख्यमंत्र्यांच्या कारमधून बनसोडेंनी केलेला प्रवास हा बरंच काही सांगून जातो असं म्हटलं जात आहे. मात्र हा प्रवास नक्की कोणत्या कारणासाठी होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.