शबाना आझमींच्या अपघातानंतर पंतप्रधान मोदीचं ट्विट, म्हणाले....

या अपघातामध्ये शबाना आझमी गंभीर जखमी झाल्या आहेत.

Updated: Jan 18, 2020, 10:29 PM IST
शबाना आझमींच्या अपघातानंतर पंतप्रधान मोदीचं ट्विट, म्हणाले....

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीचा शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. या अपघातामध्ये शबाना आझमी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही बातमी ऐकून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून शबाना आझमी यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले, शबाना आझमी यांच्या अपघाताचे वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होवोत, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

या अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुरुवातीला त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर येथे शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात झाला. शबाना आझमी आणि त्यांच्या कार चालकाला या गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी आझमी यांचे पती, गीतकार जावेद अख्तरही कारमध्ये होते. पण, त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. 

शबाना यांचे पती जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस १७ जानेवारी म्हणजे कालच साजरा करण्यात आला. हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. जावेद अख्तर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती.