पुन्हा राजकीय सामना? नारायण राणे आणि उद्धव ठाकरे येणार एकाच मंचावर

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून नारायण राणे आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगली आहे

Updated: Sep 8, 2021, 06:16 PM IST
पुन्हा राजकीय सामना? नारायण राणे आणि उद्धव ठाकरे येणार एकाच मंचावर title=

मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळावरुन (Chipi Airport Inauguration) राजकीय वातावरण तापलं आहे. चिपी विमानतळाच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेनेमध्ये (shivsena) लढाई सुरु झाली आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबर 2020 रोजी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं. तसंच उद्घाटनाला मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही' असं उत्तर राणे यांनी दिलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. 

मुख्यमंत्री उपस्थित राहणार

पण चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली आहे. विनायक राऊत यांनी दिलेल्या माहितीनूसार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही यावर उत्तर दिलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक उद्योग विभाग असल्याने मीसुद्धा या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायला उपस्थित राहणार आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

राणेंचं योगदान नाकारु शकत नाही

याप्रकरणावर बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सावध भूमिका घेतली आहे. 'सर्व गोष्टी समनव्यानेच झाल्या पाहिजेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पण चिपी विमानतळ तयार करण्यात नारायण राणे यांचा सहभाग कोणी नाकारु शकत नाही. त्यांच्या पुढाकारानेच काम सुरु झालं आणि मी मुख्यमंत्री असताना काम पूर्ण झालं. आता विमानतळ सुरु होत असताना वाद निर्माण न करता कोककणासाठी आणि पर्यटनासाठी चालना देणारं विमानतळ सुरु होणं महत्वाचं आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.