'लाट आल्याने मनसेची पडझड झाली, पण आता नव्याने झेप घेऊ'

या माध्यमातून सरकारच्या चुका नजरेस आणून दिल्या जातील.

Updated: Mar 9, 2020, 11:15 AM IST
'लाट आल्याने मनसेची पडझड झाली, पण आता नव्याने झेप घेऊ' title=

मुंबई: गेल्या काही काळात देशभरात आलेल्या राजकीय लाटांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) पडझड झाली. मात्र, आगामी काळात आमचा पक्ष नव्याने झेप घेईल, असा विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटसंदर्भात भाष्य केले. अनेक देशांमध्ये अशाप्रकारची शॅडो कॅबिनेट आहेत. मनसेचे शॅडो कॅबिनेटही याच पद्धतीने काम करेल. या माध्यमातून सरकारच्या चुका नजरेस आणून दिल्या जातील, प्रसंगी आंदोलनही केले जाईल.

राज ठाकरे - मिलिंद एकबोटे यांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

मराठी पाट्या, भाषेचे आंदोलन असो किंवा टोल प्रश्नाचे आंदोलन, यामधून आम्ही जनतेचेच प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे जनता आम्हाला गांभीर्याने घेईल, असा विश्वासही यावेळी सरदेसाई यांनी व्यक्त केला. 

नवी मुंबईत 'राज'वाणी; मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा

दरम्यान, रविवारी कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याविषयी सरदेसाई यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, कोरेगाव-भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यावर केवळ आरोप आहेत. त्यांचा गुन्हा अजूनही सिद्ध झालेला नाही. लोकशाहीत कुणी कुणालाही भेटू शकतो, असे नितीन सरदेसाई यांनी सांगितले. 

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबईबाहेर होत आहे. त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

काल भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. दोघांमधील चर्चेचा तपशील अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, आगामी नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.