मुंबईत बॅनर : 'भाजप आमदार नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस'

BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर (Banner) लावण्यात आले आहे.  

Updated: Dec 31, 2021, 08:03 AM IST
मुंबईत बॅनर : 'भाजप आमदार नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस' title=

मुंबई : BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर (Banner) लावण्यात आले आहे. त्या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असेही लिहिण्यात आले आहे. (Poster in Mumbai: 'BJP MLA Nitesh Rane lost, chicken reward for finder')

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. तसेच नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली. 

नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत पोस्टबाजी करण्यात आली आहे. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे बॅनर कोणी लावले असेल, याची जोरदार चर्चा शहरात करण्यात येत आहे.

शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने 

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने संध्याकाळी राडा झाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमले. शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला. तर भाजप कार्यकर्त्यांनी दुसऱ्या बाजूने घोषणाबाजी केली. पोलिसांच्या आवाहनानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते पांगले आणि तणाव निवळला. 

शिवसैनिकांनी न्यायालयाबाहेर फोडले फटाके 

भाजप आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर शिवसैनिकांनी न्यायालयाबाहेर फटाके फोडले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरापासून काही अंतरावरच शिवसैनिकांनी हा जल्लोष केला. दुसरीकडे मुंबईतही शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.