गणेशोत्सव हा सार्वजनिक सण; लालबागचा राजाच्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांकडेच द्या- आंबेडकर

लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. 

Updated: Sep 20, 2018, 04:30 PM IST
गणेशोत्सव हा सार्वजनिक सण; लालबागचा राजाच्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांकडेच द्या- आंबेडकर title=

मुंबई: काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या मंडपात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी भाष्य केले. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाच्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांकडेच दिले पाहिजे असे म्हटले. गणेशोत्सव हा सार्वजनिक सण आहे. सरकारने त्यावर नियंत्रण आणले पाहिजे. त्यासाठी गणेशोत्सवाच्या १५ दिवसांपूर्वी पोलिसांकडे नियंत्रण देणे गरजेचे आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांना होणारी धक्काबुक्की चुकीची आहे. जर तिरुपतीला गर्दीचे नियंत्रण व्यवस्थितपणे होत असेल तर लालबागच्या राजाच्या मंडपात ते शक्य का नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. 
 
 काही दिवसांपूर्वी लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की केली. 
 
 लालबागच्या राजाच्या दर्शनाला झालेली गर्दी नियंत्रित कशी करायची, यावरुन वाद सुरू झाला. आम्हाला आमचे काम करू द्या, असे पोलिसांचे म्हणणे होते. तर गर्दीचे काय ते आम्ही बघतो, असे लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यावरुन हमरीतुमरी सुरु झाली आणि कार्यकर्त्यांनी चक्क पोलिसांनाच धक्काबुक्की सुरू केली.