मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. २६ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर सीएए आणि एनआरसीविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी बोलावलं होतं. या बैठकीत या मोर्चाबाबत तसंच इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जी आणि शिक्षक आमदार कपिल पाटील जी यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री @Subhash_Desai जी उपस्थित होते. pic.twitter.com/vJzhdILSej
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 24, 2019
मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्यानंतर देशभरात याला विरोध होत आहे. तर या सीएएच्या समर्थनात ही आता मोर्चे निघत आहेत. दुसरीकडे काही राज्यांनी हा कायदा लागू करण्यास नकार दिला आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यावरुन संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. आठ राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिल्यानंतर आता महाराष्ट्रातही विरोध होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात एकही डिटेंशन कॅम्प उभारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याची भिती बाळगू नका, असं आवाहनही त्यांनी याआधी केलं आहे. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाला त्यांनी दिला होता. राज्यात शांततेचे वातावरण ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.