'ज्यांची नियत साफ, त्यांना फरक पडत नाही' 4 तासांच्या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

 मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशी

Updated: Apr 4, 2022, 03:24 PM IST
'ज्यांची नियत साफ, त्यांना फरक पडत नाही' 4 तासांच्या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया title=

मुंबई : मुंबै बँकेवर (Mumbai Bank) मजूर म्हणून निवड झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची (Pravin Darekar) पोलिसांकडून 4 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दरेकरांची चौकशी करण्यात आली. यावेळी भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. मुख्य प्रश्न विचारून झाले असताना पोलीस मुद्दाम वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप दरेकरांच्या वकिलांनी केला आहे. 

दरम्यान, 4 तास चौकशी झाल्यानंतर पोलीस स्थानकाबाहेर येत माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. पोलिसांवर सरकारचा प्रचंज दबाव असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. 

प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलं?
बँकेकडून काही लाभ घेतला गेला का, यासारखे गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न तीन तासात विचारण्यात आले. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की आम्ही सहकार्याला तयार आहोत. 

जी नोटीस पाठवणं आम्हाला अपेक्षित होतं, त्यांना जी जी माहिती हवी होती, ती तपशीलवार दिली. अनेक उलट सुलट तेच तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रकार करण्यात आला. पण ज्यांची नियत साफ आहे, त्यांना असल्या गोष्टींचा फरक पडत नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. 

अत्यंत मुद्देसूद माहिती दिली. अनेक नियमबाह्य प्रश्न विचारण्यात आले. मुंबईचे पोलीस आयुक्त मॉनिटेर करत होते, त्यांचा दबाव पोलीस अधिकाऱ्यांवर असल्याचं  दिसत होतं. सहा सातवेळा अधिकाऱ्यांना फोन येत होते, कोणाचे फोन होते हे समजलं नाही, असंही दरेकर यांनी सांगितलं.

आवश्यकता वाटल्यास पुन्हा बोलवू असं सांगण्यात आलं आहे. जेव्हा बोलतील तेव्हा जाऊ, पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं दिसतंय, असा आरोप दरेकर यांनी केला.