मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांचा उजवा हात म्हणून प्रवीण परदेशी यांची ओळख आहे.

Updated: May 10, 2019, 06:38 PM IST
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती title=

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी शुक्रवारी राज्य सरकारकडून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवीण परदेशी सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. परदेशी हे १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. मुख्यमंत्र्यांचा उजवा हात म्हणून त्यांना संबोधले जाते. सुसंवाद साधणारा आणि कुशल प्रशासकीय अधिकारी म्हणून परदेशी यांची ओळख आहे. फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका असतील किंवा आंतरराष्ट्रीय दौरे असतील परदेशी यांना आपल्या सोबत घेतले होते. परदेशी यांनी आतापर्यंत वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास आणि महसूल अशा विविध खात्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. १९९३ साली लातूर जिल्ह्यात भूंकप आला होता, तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळच्या त्यांच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक करण्यात आले होते.

तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सध्याचे मुख्य सचिव युपीएस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने अजोय मेहता यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे ४ वर्षांहून अधिक काळ आयुक्त पदावर राहण्याचा विक्रम अजोय मेहतांनी केला आहे.