उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामातही टक्केवारी मागतील- निलेश राणे

ठेकेदार हुशार आहे, त्यांना या गोष्टी समजतात.

Updated: May 10, 2019, 04:21 PM IST
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामातही टक्केवारी मागतील- निलेश राणे title=

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठीही उद्धव ठाकरे ठेकेदारांकडून टक्केवारी मागतील, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश यांनी केले. त्यांनी शुक्रवारी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. 

औरंगाबादमध्ये महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी तब्बल ६५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवन विकसित केले जाणार आहे. या कामासाठी औरंगाबाद महानगरपालिकेकडून निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उद्धव ठाकरे या कामातही पाच टक्के मागतील, हे ठेकेदार जाणून असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या टीकेला शिवसेना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, मुंबईतही महापौरांचे जुने निवासस्थान असलेल्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच हा बंगला खाली करण्यात आला होता. या स्मारकाच्या कामासाठी राज्य सरकारने १०० कोटींची तरतूदही केली होती. 

नारायण राणे यांचे 'नो होल्ड बार्ड' हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. मात्र, यामधील काही मजकूर बाहेर आल्याने प्रकाशनापूर्वीच हे आत्मचरित्र प्रचंड गाजत आहे. या आत्मचरित्रात नारायण राणे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबरोबरच शिवसेना का सोडली, याची खरी कहाणी सांगितली आहे. उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यामुळे मला शिवसेनेतून बाहेर पडावे लागले. राणेंना पक्षात ठेवलं तर मी रश्मी ठाकरे यांच्यासोबत घरातून निघून जाईल, अशी धमकी उद्धव यांनी बाळासाहेबांना दिल्याचा गौप्यस्फोट राणेंनी या आत्मचरित्रामध्ये केल्याचे समजते.