उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे

Updated: Dec 8, 2022, 04:49 PM IST
उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट title=
(फोटो सौजन्य - PTI)

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात (Bombay High Court) दिलीय. उद्धव ठाकरे आणि त्यांत्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका गौरी भिडे (petitioner Gauri Bhide) यांनी हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.

ही याचिका सुनावणीस योग्य नसल्याचा युक्तीवाद उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात सामना या मुखपत्राच्या साडे अकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरुनही या याचिकेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? असा सवाल देखील विचारण्यात आला होता. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत गौरी भिडेंनी केली आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देणार याकडे लक्ष लागलंय.

गौरी भिडे यांच्या या याचिकेमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. आज न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.  न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

उद्धव ठाकरेंवर आरोप काय आहेत?

याचिकाकर्त्या गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे सामना वृत्तपत्र आणि मार्मिक या साप्ताहिकाने कोरोना काळातही कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही कोणत्याही व्यवसायाच्या उत्पन्नाचे स्रोत दाखवले नाहीत. तरीही त्यांच्याकडे मुंबईसारख्या शहरात आणि रायगड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे, असा दावाही याचिकाकर्त्या गौरी भिडे यांनी केला आहे.