विधानसभा निवडणूक तयारी, काँग्रेस पक्षाची बैठक

 राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसची बैठक होत आहे. 

Updated: Jun 13, 2019, 07:08 PM IST
विधानसभा निवडणूक तयारी, काँग्रेस पक्षाची बैठक  title=

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसची बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकीचा आढावा घेण्याबाबत आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत काँग्रेस आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी लागला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या पन्नास टक्के जागांची मागणी सुरू केली आहे.  

काँग्रेसच्या या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अमित देशमुख, आशिष दुआ, चेल्ला वामशी रेड्डी, भी. एम. संदीप, संपतकुमार, माजी मंत्री जयवंत आवळे, बसवराज पाटील, खा. हुसेन दलवाई, कृपाशंकर सिंह, शरद रणपिसे, माजी खा. एकनाथ गायकवाड, आ. के. सी. पाडवी, जयप्रकाश छाजेड, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, पृथ्वीराज साठे आदी उपस्थित आहेत.