मुंबई | कुर्ला स्टेशनच्या अडचणी काय?

एल्फिन्स्टन स्टेशनमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी नंतर रेल्वे प्रशासन जागं झालंय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2018, 02:48 AM IST
मुंबई | कुर्ला स्टेशनच्या अडचणी काय? title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, कुर्ला - मुंबई : एल्फिन्स्टन स्टेशनमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी नंतर रेल्वे प्रशासन जागं झालंय.  रेल्वेच्या रखडलेल्या अनेक कामांना आता गती मिळालीय. 

असं असलं तरी मुंबईतल्या महत्वपूर्ण स्थानकावर सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, प्रवाशांच्या काय मागण्या आहेत, याचा आम्ही आढावा घेतोय. कृपया इकडे लक्ष द्या, या विशेष सीरिजमध्ये, त्याचअंतर्गत कुर्ला रेल्वे स्थानकाचा लेखाजोखा मांडणार हा रिपोर्ट.

मध्य रेल्वेवरच्या सर्वाधिक गर्दीच्या स्टेशन्सपैकी एक कुर्ला स्टेशन. या स्टेशनवरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गर्दीचं व्यवस्थापन. बी के सी सारखं व्यावसायिक संकुल कुर्ला स्थानकापासून जवळ आहे. तसंच हार्बर रेल्वेमार्गे नवी मुंबईही याच स्थानकावरुन जोडली गेलीय. गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीकोनातून प्रवाशांच्या काही प्रमुख मागण्या आहेत.

कुर्ला स्थानकात पाच फूटओव्हर ब्रीज आहेत.... ते एकमेकांना जोडलेले असावेत 

कुर्ला पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा जो भुयारी मार्ग आहे त्याला कुर्ला स्थानकाच्या प्लॅटफॉर्मला जोडावं

हार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी कुर्ला-पनवेल सेवा सुरू व्हावी

हार्बरच्या 7 आणि 8 नंबरच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी

कुर्ला स्थानक ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा फूट ओव्हर ब्रीज तयार करावा 

कुर्ला स्थानकात मोठ्या प्रमाणात भिकारी, गर्दुल्ले यांचा वावर असतो... त्याला आळा बसावा 

कुर्ला स्थानकाजवळ पार्किंगची व्यवस्था करावी 

कुर्ला स्थानकावर दररोज अंदाजे तीन ते साडे तीन लाख प्रवासी प्रवास करतात.2016 मध्ये कुर्ला रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडणं आणि इतर अपघातात 387 जणांचा तर 2017 मध्ये 350 लोकांचा मृत्यू झाला होता. 

वाढती गर्दी पाहता तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केली असली तरी त्यामध्ये सुसूत्रता, समन्वय आणि योग्य नियोजन  गरजेचं आहे.