रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार उघड, रॅकेट पुरवायचे दहशतवादासाठी पैसे

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे सर्वात मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहे.  

Updated: Feb 26, 2020, 11:48 PM IST
रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार उघड, रॅकेट पुरवायचे दहशतवादासाठी पैसे title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : आरपीएफच्या आत्तापर्यंतच्या कारवाईत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे सर्वात मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहे. रेल्वेच्या कन्फर्म ई तिकिटांचा काळाबाजार करून कोट्यवधी रुपये दहशतवादासाठी पुरवणारे दलालांचे रॅकेट आरपीएफने उध्वस्त केले आहे. २०१२ पासून सुरू असलेल्या या रॅकेटची पाळेमुळे मुंबई, नवी मुंबईसह सुरतमार्गे दुबईपर्यंत पसरली होती. दरम्यान, अटक केलेल्या एका आरोपीवर दहशतवादाचे गुन्हे आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा समांतर तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.

आरपीएफने देशभर केलेल्या या धडक कारवाईत दलालांकडून पुढील तारखेची तब्बल २७ हजार ९४८ तिकिटे जप्त करून रद्द केल्याने जादा पैसे देऊन तिकिटे घेणार्‍या प्रवाशांनाही झटका बसला आहे. रॅकेट चालवणारा मुख्य सूत्रधार अमिन काग्झी याला आरपीएफने सुरतमधून अटक केली आहे. एएनएमएस आणि मॅक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून २०१६ नंतर सूत्रधार एकावेळी हजारो ई तिकिटांचे बुकिंग करणारे सॉफ्टवेअरची विक्री करत होते. 

या सॉफ्टवेअरमुळे सणासुदीला सोडण्यात येणार्‍या अतिगर्दीच्या गाड्यांची शेकडो तिकिटे काही मिनिटांतच बुक केली जायची. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होत नव्हती. याउलट दलालांमार्फत हीच तिकिटे जादा पैसे घेऊन काळ्याबाजारातून विकली जायची. तात्काळ बुकिंग सुरू होताच क्षणी काही मिनिटांतच तिकिटांची विक्री होत असल्याने तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची शंका निर्माण झाली. 

दरम्यान, तिकिट खिडक्यांवर काळाबाजार करणार्‍या दलालांविरोधात आरपीएफने वर्षभरापूर्वी मोहीम हाती घेतली होती. मात्र या मोहिमेनंतर इतक्या मोठ्या संख्येने तिकिटे तत्काळ बुक होत असल्याने या प्रकरणात तांत्रिक गोष्टींचा समावेश असल्याचा संशय आरपीएफला आला. त्यानुसार बंगळुरुमधून गुलाम मुस्तफा यास अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ जानेवारीपासून आठ फेब्रुवारीपर्यंत देशभरात छापे टाकत आरपीएफने मोठे रॅकेट उध्वस्त केले. या कारवाईत तिकिटांच्या काळ्याबाजारातून निर्माण होणार्‍या पैशांतून दुबईसह विविध ठिकाणी मालमत्ता विकत घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

0