राज-राणांमुळे हिंदुत्व सिद्ध करण्याचा खटाटोप, 'हिंदुत्वा'च्या तारेवर शिवसेनेची कसरत

आधी राज ठाकरे आणि नंतर नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

Updated: Apr 26, 2022, 10:18 PM IST
राज-राणांमुळे हिंदुत्व सिद्ध करण्याचा खटाटोप, 'हिंदुत्वा'च्या तारेवर शिवसेनेची कसरत title=

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अधिक आक्रमक हिंदू कोण, यावरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. एकेकाळचे हे हिंदुत्ववादी मित्रपक्ष... मात्र आता आपण अधिक कडवे हिंदू आहोत, हे दाखवण्याची शर्यत लागली आहे.

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासूनच भाजप आणि शिवसेनेत हिंदुत्वावरून जोरदार रस्सीखेच रंगली आहे. मात्र आता राज ठाकरेंनीही मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा काढून हिंदुत्वावरून शिवसेनेची कोंडी केली. हे कमी होतं की काय यात खासदार नवनीत राणांनी उडी घेतली. 

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याचं आव्हान देणा-या राणांना अटक झाल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं आहे. त्यामुळेच राज आणि राणा दाम्पत्याला नवहिंदू म्हणत धडा शिकवण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली. तर घंटाधारीवरून केलेल्या टीकेला उत्तर देत भाजपनं थेट अजानवालं हिंदुत्व म्हणत शिवसेनेला हिणवण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या सेक्युलर पक्षांसोबत मैत्री करताना हिंदुत्वाच्या दगडावरचा पाय काढण्याची शिवसेनेची तयारी नाही. तर आतापर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मिळणारी मतं खेचण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. त्यामुळे सेक्युलर मित्रपक्षांना न दुखवता शिवसेनेला हिंदुत्वासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय. मात्र याचा शिवसेनेला फटका बसणार की फायदा होणार हे आगामी निवडणुकांमध्येच स्पष्ट होणार.