मुंबई : विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी कु्ष्णकुंजवर विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत राज यांनी पक्षाच्या पदाधिका-यांची कानउघडणी केल्याची माहिती समोर येतेय.
आंदोलनात पक्षाच्या पदाधिका-यांना विरोधी गटाकडून होत असलेल्या मारहाणीबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केल्याचंही बोललं जातंय. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विरोधी गटाकडून मार मिळाल्याची अलीकडच्या काळातली दुसरी घटना आहे. महिनाभरापूर्वी मालाडमध्ये विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता.
आंदोलनांमध्ये मला मार खाणारे नाहीत, तर मार देणारे कार्यकर्ते अपेक्षित असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी नुकतीच व्यक्त केली होती. येत्या शुक्रवारी अनधिकृत फेरीवाला प्रकरणात मनसे पदाधिका-यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पत्र दिले जाणार आहे. ते पत्र स्थानिक महापालिका आणि पोलीस अधिका-यांना देऊन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज यांनी दिल्यात.