close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आघाडीत बिघाडी, राजू शेट्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत

स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता.

Updated: Feb 11, 2019, 07:55 PM IST
आघाडीत बिघाडी, राजू शेट्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत

दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडी संदर्भात लवकर प्रतिसाद मिळत नसल्याने राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आता स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार करत आहे. जागावाटपात हातकणंगले सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माढा बुलढाणा आणि वर्धा या चार जागांवर दावा सांगितला होता. मात्र हातकणंगले वगळता इतर तीन जागांबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने राजू शेट्टी शेट्टी नाराज आहेत. येत्या आठवडाभरात यासंदर्भात निर्णय झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याची तयारी राजू शेट्टी यांनी केली आहे.

दुसरीकडे उसाच्या एफआरपीबाबत राजू शेट्टी यांचे सुरू असलेले आंदोलन हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्यांविरोधातच सुरू आहे. अशा वेळी कांग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची का याबाबतही कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे .सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माढामधून शरद पवार उभे राहणार असले तरी या जागेवरील दावाही राजू शेट्टी यांनी सोडलेला नाही.

येत्या आठवडाभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून राजू शेट्टींना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभा निवडणुकीची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शरद पवार आपल्याला झुलवत असल्याची भावनाही राजू शेट्टींचे झाले असून त्यातूनच पवार अविश्वासू असल्याचे मत राजू शेट्टी यांनी एका मुलाखतीत मांडलं होतं.