राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  

Updated: Mar 13, 2020, 02:07 PM IST
राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी  title=

मुंबई : राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेसकडून राजीव सातव आणि शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदींनी आज विधानभवनात दाखल होत अर्ज दाखल केला. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा, तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून याआधीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

महाविकासआघाडीच्या चौथ्या उमेदवाराबाबत निर्णय होत नव्हता. चौथ्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आग्रही होते. अखेर ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या फौजिया खान या उमेदवारी अर्ज भरतील, असे बोललं जात होते. चौथ्या जागेचा हा तिढा महाविकासआघाडीच्या समन्वय समितीमध्ये सोडवला जाईल, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सांगितले होते. आज राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना उमदेवारी देण्यात आली आहे.

राजीव सातवांना जाहीर केली आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सातवांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचा पत्ता कापला गेला आहे. सातवांना गुजरात आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत यशस्वीरीत्या काम केल्यामुळे त्यांना संधी देण्यात सांगितले जात आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव हिंगोली मतदारसंघातून निवडून आले होते. यानंतर २०१९ सालच्या निवडणुकीत सातव यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

राज्यसभेवर महाराष्ट्रातून सात खासदार जाणार आहेत. यातले चार हे महाविकासआघाडीकडून तर तीन जण भाजपकडून राज्यसभेवर जातील. भाजपने उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकासआघाडीने राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे.