घटकपक्षांना मुख्यमंत्री कोणाचा हवाय, रामदास आठवले म्हणाले....

 उद्धव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत.

Updated: Oct 31, 2019, 12:55 PM IST
घटकपक्षांना मुख्यमंत्री कोणाचा हवाय, रामदास आठवले म्हणाले.... title=

मुंबई: महायुतीमधील घटकपक्षांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अधिक योग्य वाटतात, असे मत 'रिपाई'चे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी व्यक्त केले. महायुतीमधील रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना आणि शिवसंग्राम या तीन घटकपक्षांची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी प्रत्येक घटकपक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. 

आमच्या चार घटकपक्षांचे मिळून सात आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला एक-एक कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करू. मात्र, सर्वच गोष्टी मागून मिळत नाहीत, असेही आठवले यांनी म्हटले. 

यावेळी घटकपक्षांना मुख्यमंत्री शिवसेनेचा की भाजपचा हवा, असा प्रश्न आठवले यांना विचारण्यात आला. त्यावर आठवले यांनी म्हटले की, उद्धव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. दोघांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असावेत आणि उद्धव ठाकरे आमचे नेते असावेत, अशी मित्रपक्षांची भावना असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील तिढा अमित शहा मुंबईत आल्यानंतरच सुटेल, अशी नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून सत्तावाटपाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदे देण्यात येतील. गेल्यावेळपेक्षा शिवसेनेला दोन मंत्रिपदे जास्त मिळणार आहेत. याशिवाय, केंद्रातही शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद वाढवून मिळेल. तर भाजप स्वत:कडे २३ मंत्रिपदे ठेवेल, अशी अटकळ आहे.