Ranjeet Savarkar On Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकारण तापलं आहे. कॉंग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) महाराष्ट्रात आहे. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे आणि त्यांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी ब्रिटिशांची माफीही मागितली होती, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. आता या वादात रणजीत सावरकर यांनी उडी घेत राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. रणजीत सावरकर हे विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तरं दिली आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी दयेचा अर्ज केलाच नव्हता, असं रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
सावरकरांनी माफीचा अर्ज केला नव्हता. तर त्यांना सोडण्यात आलं नव्हतं म्हणून त्यांनी कायद्यानुसार अर्ज केला होता, असं सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी म्हटलंय. सावरकरांनी ज्या पद्धतीचं पत्र लिहिलं होतं. तसंच पत्र गांधीजींनीही लिहिलं होतं. मग गांधीजीही इंग्रजांचे नोकर व्हायला तयार होते, असा अर्थ काढायचा का, असा सवाल त्यांनी केलाय.
महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेही (Shivsena) या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली नाराजी व्यक्त करत आपण सावरकरांचा आदर करतो, असे म्हटले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही (NCP) राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.