धक्कादायक ! मुंबईतील या रुग्णालयात उंदरांनी कुरतडले रुग्णाचे डोळे

मुंबईतल्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Updated: Jun 22, 2021, 05:35 PM IST
धक्कादायक ! मुंबईतील या रुग्णालयात उंदरांनी कुरतडले रुग्णाचे डोळे title=

मुंबई : घाटकोपरच्या ( Ghatkopar ) राजावाडी रुग्णालयातील ( Rajawadi Hospital ) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोन दिवसापूर्वी या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांनी हा आरोप केल्यानंतर रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूजवर, आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. 

उपचार घेत असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडले असल्याचे समोर आले आहे.याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्स ना सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. 

तर सदरचा आयसीयु रूम हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा वावर आहे, आणि प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचेच दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी दिली आहे.

झी२४तासने ही बातमी दाखवल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.  महापौरांनी म्हटलं की, ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे. रूग्णाच्या डोळ्याच्या पापण्यांचा व आजूबाजूचा भाग कुरतडला गेला आहे. आयसीयू पूर्णपणे पॅक आहे. परंतु पावसाळा असल्यानं व आयसीयू खालच्या मजल्यावर असल्यानं दरवाजा उघडल्यावर उंदीर आत गेला असावा. व्हेंटीलेटरवर रूग्ण असल्यानं संवेदना नव्हत्या.  याची पूर्णपणे चौकशी केली जाईल. ही गंभीर बाब आहे.'