मुंबई : कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या अधिक आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचा मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे. मुंबई कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. आतापर्यंत फक्त मुंबईत ७१४ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे ४५ लोकांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद आहे.
मुंबईत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोना व्हायरसचा संसर्ग हा मुंबईत वेगाने पसरत आहे. याला काही प्रमुख कारणं आहेत.
१. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत कोरोना तपासणीची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहेत. कोरोनाबाधित परिसरात जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
२. कोरोनाग्रस्तांना लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचा शोध घेतला जात आहे. स्वतःहून त्या लोकांना शोधून त्यांची चाचणी केली जात आहे. यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
३. मुंबईची लोकसंख्या ही घनता प्रति चौरस किमीला २०,६३४ एवढी आहे. यामुळे कोरोना व्हायरचा संसर्ग होण्यासाठी तर हे पोषकच आहे. कोरोना व्हायरसने आता मुंबईतील झोपडपड्यांमध्ये शिरकाव केला आहे. मुंबईतील धारावी आणि कोळीवाडा परिसरात कोरोनाची लागण सर्वाधिक झाल्याचं दिसून येत आहे.
४. धारावीत आतापर्यंत आढळलेल्या सर्व कोरोनाग्रस्त रूग्णांच मरकाज कनेक्शन आढळून आलं आहे. धारावीत आतापर्यंत सापडलेल्या सर्व केसेस या निझामुद्दीनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील होत्या. धारावी ही मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.
५. २०१२ च्या एनएसएसच्या सर्व्हेनुसार मुंबईतील झोपडपट्यांनी ७% मुंबई ओढून घेतली आहे. मुंबईतील १० पैकी ४ मुंबईकर हे झोपडपट्टीत राहतात. यामुळेच कोरोनाची संख्या वाढत चालली आहे.
६. प्रशासनाने मुंबईकरांना घरात राहण्याचा सल्ला दिला तरी महाराष्ट्रातील ६०% घरांमध्ये संडासची व्यवस्था नाही. तसेच ३५% लोकांच पिण्याचं पाणी हे घराबाहेरच येतं. अशावेळी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळांचा वापर करावा लागतो. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्शिंग पाळणं कठीण होतं. यामुळे मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाची लागण वाढत आहे.
७. वॉक्हार्ट रूग्णालयातील कर्मचारी वर्गांमध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळून आलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात अनेक रूग्ण अथवा सामान्य माणसे आली असतील तर याचा धोका सर्वाधिक आहे.