मुंबई : संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही भागांत डी 2,3 स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पुढील 48 तास मुंबईसह उपनगरं आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असून, सोमवारी पावसानं पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरलं. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचलं. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.
ठाणे शहरातील शिळफाटा परिसरात सलग दोन दिवस पूरस्थिती निर्माण झालीय. शिळ गावातील दोस्ती वसाहतीसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे भला मोठा ओढा बुजविण्यात आलाय. परिणामी, ही पूरस्थिती होत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळं विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी कंबरभर पाण्यातून वाट काढत ही भिंतच पाडलीय. त्यामुळे परिसरातील 300 ते 400 कुटुंबियांना दिलासा मिळालाय. हा ओढा बुजविण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. याच भागातील साई टॉवर या वसाहतीलाही धोका निर्माण झाला होता. एमएमआरडीए, ठाणे मनपा शहर विकास यांनी जाणीवपूर्वक या ओढ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पठाण यांनी केलाय.
भिवंडी शहरात रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ईदगाह रोड, खाडीपार, कारीवली, मुख्य बाजारपेठ, तीन बत्ती, भाजी मार्केट मंडई परिसरात 3 ते 4 फुटांपर्यंत पावसाचं पाणी साचलं. हे पाणी दुकानं आणि घरांमध्ये शिरलं. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महापालिका आपत्कालीन व्यवस्थापनाच्या वतीनं प्रयत्न सुरु आहेत. भिवंडीत अनेक ठिकाणी असंच चित्र पाहायला मिळतंय.
वसईच्या सनसिटी रोडवर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र एका चालकानं तरीही आपली एसयूव्ही गाडी पाण्यातून नेली. मात्र गाडीत पाणी शिरलं आणि ती पाण्यात तरंगू लागली. रस्त्याच्या कडेला वाहून गेलेली कार स्थानिकांनी दोरखंड लावून बाहेर काढली. यात गाडीचं मोठं नुकसान झालंय.