'या' कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, राज्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. 

Updated: Jun 30, 2020, 08:24 AM IST
'या' कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, राज्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती title=
संग्रहित छाया

मुंबई : सध्या शहर आणि मुंबई उपनगर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. या लोकल सेवेतून केवळ राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवास करता येत आहे. मात्र, केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येत नाही. त्यामुळे अशी कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली आहे.

देश आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. काही अत्यावश्यक बाबींसाठी विशेष रेल्वे सुरु आहेत. दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. ती मागणी रेल्वे मंत्रालयाकडून पूर्ण करण्यात आली. मात्र, विशेष लोकलमधून केवळ राज्यातील अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करता येत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. तसेच आम्हाला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. याचा विचार करुन राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला विनंती केली आहे, या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी.

त्यानंतर राज्य सरकारकडून विनंती करण्यात आली आहे. केंद्र शासनाची राज्यातील वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत राज्य शासनाकडून रेल्वे मंत्र्यालयाला विनंती. याविषयीचा अंतिम निर्णय रेल्वेमार्फत घेतला जाणार, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.