केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
'कर्ली टेल्स' या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले. यावेळी उत्तर देताना त्यांनी त्यांचे वजन 45 किलो घटवल्याचेही सांगितले.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, "मी सर्वात आधी या वादग्रस्त प्रश्नाचे उत्तर देतो. मला मुंबई प्रचंड आवडते. मुंबईसारखं काहीही नाही. मुंबईत तुम्हाला रात्री 12 वाजता कमी पैशात काही ना काही तरी खायला नक्कीच मिळेल. मला मुंबईची भेळ आवडते. पावभाजी, पुलाव, वडापाव, सँडविच यासारखे अनेक मुंबईतील पदार्थ मला आवडतात. मुंबईत मी चार पाच हॉटेल आहेत, तिथे अजूनही जातो. तसेच रस्त्यावर भेळचे स्टॉल असतात, तिथे भेळही खातो. मुंबईसारखं काहीही नाही."
"दिल्लीत फक्त आलू पराठा आणि पनीर याच दोन गोष्टी मिळतात. मी पनीर आणि मशरुम खात नाही. जास्त बटाटा खाणे शरीरासाठी चांगलं नाही. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढते. मला शाकाहारी चायनीज प्रचंड आवडते. मी आधी खूप खायचो. पण आता फार मर्यादित प्रमाणात जेवतो. दोन चपात्या, फार थोडा भात हे एवढंच मी खातो. पूर्वी मी एकावेळी सहा समोसे खायचो.
मी पूर्वी मुंबईतील 'सुख सागर' या हॉटेलमध्ये जायचो, तिथे एक मसाला डोसा, पुलाव, पिझ्झा, केसर मिल्कशेक हे सर्व खायचो. पण आता तिथे गेल्यावर कमी खातो. एकदा त्याने मला विचारले, सर आमच्या जेवणाची चव बदलली आहे का? त्यावर मी त्याला म्हटले अरे असं काहीही नाही. मी थोडा संयमाने खातो. माझे वजन पूर्वी 135 किलो होते आणि आता ते 90 किलो आहे. मी माझ्या खाण्यावर नियंत्रण ठेवले आहे", असा किस्साही नितीन गडकरींनी यावेळी सांगितला. या मुलाखतीत नितीन गडकरींनी राजकीय कारकिर्द, जेवणाची पथ्य, वजनावर केलेले नियंत्रण, रस्ते व सुरक्षा यांसह विविध विषयांवर भाष्य केले. सध्या त्यांची ही मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे.