साहेबांनी 'कुक्कुटपालना'साठीही केंद्राला उपाययोजना सुचवल्यात; रोहित पवारांचा राणेंना टोला

महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे साखर उद्योगासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही आता या उद्योगाला वाचवा म्हणण्याची वेळ का येते, असा खोचक सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला होता. 

Updated: May 16, 2020, 04:08 PM IST
साहेबांनी 'कुक्कुटपालना'साठीही केंद्राला उपाययोजना सुचवल्यात; रोहित पवारांचा राणेंना टोला title=

मुंबई: महाराष्ट्रातील साखर उद्योगाला कोरोनाच्या संकटातून वाचवा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच केंद्र सरकारला पाठवले होते. यामध्ये त्यांनी कोरोनामुळे साखर उद्योगाला भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढा वाचला होता. परंतु, महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे साखर उद्योगासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही आता या उद्योगाला वाचवा म्हणण्याची वेळ का येते, असा खोचक सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला होता. तसेच आजवर साखर उद्योगावर झालेल्या खर्चाचे ऑडिट करण्याची मागणीही निलेश यांनी केली होती.
 
निलेश राणे यांच्या या आरोपांना शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही तितक्याच खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.  रोहित पवार यांनी निलेश राणे यांना उद्देशून म्हटले आहे की, मी आपणास सांगू इच्छितो की, साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता निलेश राणे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे हे तिघेजण सातत्याने राज्य सरकारच्या कारभारावर टीका करत असतात.  काही दिवसांपूर्वीच त्यांनी सायन रुग्णालयातील दुरावस्थेचा व्हिडिओ ट्विट करून खळबळ माजवली होती. याशिवाय, इतर अनेक मुद्यांवरून नितेश राणे सरकारला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत.