कल्याणातील टांग्याची घोडदौड तब्बल १५० वर्षांनंतर थांबली

टांगा चालका बरोबर घोड्याची उपासमार..

Updated: May 16, 2020, 02:02 PM IST
कल्याणातील टांग्याची घोडदौड तब्बल १५० वर्षांनंतर थांबली title=

कल्याण : एक ऐतिहासिक वारसा असणारे एक प्राचीन शहर. बदलत्या काळात या ऐतिहासिक शहराचा कायापालट झाला असला तरी याठिकाणी एक अशी गोष्ट होती की जी तब्बल दिडशे वर्षांपासून सुरू होती. ती म्हणजे इथला टांगा व्यवसाय. मात्र कोरोनाने या दिड शतकांच्या टांग्याच्या व्यवसायावरही टाच आणत त्याची घोडदौड थांबवली आहे. टांगा चालक आणि त्यांचे घोडे या दोघांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता सर्वत्र लॉकटाऊन घोषित करण्यात आला आहे. याचा फटका कल्याणमधील टांगेवाल्यांना देखील बसला आहे. या टांगेवाल्यांचा संपूर्ण कुटुंब या व्यवसायावर आरलेला आहे. लॉकडाऊनमुळे लग्न कार्यांवर देखील बंदी आहे, त्यामुळे आणण्यात आलेले रथ देखील असेच पडून असल्याची प्रतिक्रिया टांगेवाल्यांनी दिली आहे. 

कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे रोज कष्ट करून खाणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळ्यात जूनमध्ये रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे.