दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हं आहेत. सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीत अनेकजण स्पर्धेत आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावंही विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत आहेत.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 54 जागांवर विजय मिळवला असून तो सर्वधिक जागा जिंकणारा तिसरा पक्ष ठरला आहे. 2014 च्या तुलनेत राष्ट्रवादीच्या जागा यंदाच्या निवडणुकीत वाढल्या आहेत. त्यामुळे विरोधीपक्ष नेते पद हे राष्ट्रवादीला मिळणार असल्याने पक्षात रस्सीखेच सुरु झाली आहे. पण अंतिम निर्णय हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. 2014 च्या मध्ये काँग्रेसला 41, राष्ट्रवादीला 40 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसला मिळाले होते.