भाजपनंच पसरवलंय गोहत्येचं पिशाच्छ? 'सामना'तून सोडला संशयी बाण

'कैरानात झालेल्या पराभवासारखा पराभव होईल या भीतीनं बुलंदशहरमध्ये दंगली'

Updated: Dec 7, 2018, 04:50 PM IST
भाजपनंच पसरवलंय गोहत्येचं पिशाच्छ? 'सामना'तून सोडला संशयी बाण  title=

मुंबई : आज 'सामना'मधून उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या दंगलीवरून भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील 80 जागांसाठी भाजपानंच गोहत्येचं संशय पिशाच्छ पसरवलंय की काय? असा संशय अग्रलेखात  व्यक्त करण्यात आलाय़. सगळे विरोधक एकत्र आले तर कैरानात झालेल्या पराभवासारखा पराभव होईल या भीतीनं बुलंदशहरमध्ये दंगली घडवण्यात आल्याचा संशयही सामनामधून व्यक्त करण्यात आलाय.

'उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 80 पैकी 71 जागा जिंकल्यानेच 2014 मध्ये भाजपचे केंद्रातील बहुमताचे सरकार होऊ शकले. मात्र 2019 मध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. त्यात सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे ‘कैराना’ लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीपूर्वी जसे ‘मुज्जफरनगर’ आणि मध्यंतरी ‘कैराना’ घडवले गेले तसे आता ‘बुलंदशहर’ घडवून आणले जात आहे का? त्यासाठीच गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? शेवटी सवाल उत्तर प्रदेशातील 80 जागांचा आहे' असं या लेखात म्हटलं गेलंय. 

गोहत्येचे हे ‘संशयपिशाच्च’ देशात आणखी किती जातीय हिंसाचार घडवत राहणार आहे? किती निरपराध्यांचे बळी त्यात जाणार आहेत? गोमाता हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय जरूर आहे, परंतु ज्या गाईच्या पोटात 33 कोटी देव वास्तव्य करतात त्या गाईच्या नावाने माणूस दानव बनून उन्माद कसा करू शकतो? हे कोणत्या धर्मतत्त्वात बसते? गोहत्या केल्याचा किंवा गोमांस जवळ बाळगल्याचा केवळ संशय हा एखाद्याचा बळी घेण्याचा परवाना कसा ठरू शकतो? दोन वर्षांपूर्वी खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच ‘गोरक्षणाच्या नावाखाली 80 टक्के लोक गोरखधंदा करतात, अशा संघटनांची यादी करून राज्य सरकारांनी त्याविरुद्ध कठोर कारवाई करावी,’ असे सुनावले होते. मात्र मोदी यांनी कान उपटूनही तथाकथित गोरक्षकांचा उन्माद कमी झालेला नाही हेच बुलंदशहरातील हिंसाचारावरून दिसते, असंही या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.