राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची फेर निवड

राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 30, 2018, 11:02 PM IST
राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची फेर निवड

मुंबई : राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे.  राज्य निवडणूक निर्णय अधिकारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सचिन अहिर यांच्या नावाची घोषणा केली. अहिर यांची निवड ही २०१८ ते २०२० या वर्षांसाठी करण्यात आली आहे.

आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय प्रतिनिधी, प्रमुख नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्वसंमतीने विदयमान अध्यक्ष सचिन अहिर यांची मुंबई अध्यक्षपदी पुन्हा निवड जाहीर केली. 

यापूर्वी आघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय मिल मजदूर संघात अहिर यांनी काम केले आहे. तसेच इंटक कामगार युनियनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. त्यामुळेच आगामी निवडणूक आणि मुंबईतील भाजप-शिवसेना अंतर्गत वाद लक्षात घेता ही फेर निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.