भाजपला श्रेय मिळू नये म्हणून सेनेची राजकीय खेळी

एसटी महामंडळाच्या स्वच्छता प्रकल्पाच्या माध्यमातून शिवसेनेनं वेगळाच मार्ग स्वीकारलाय.

Updated: Oct 2, 2017, 11:36 PM IST
भाजपला श्रेय मिळू नये म्हणून सेनेची राजकीय खेळी title=

मुंबई : एसटी महामंडळाच्या स्वच्छता प्रकल्पाच्या माध्यमातून शिवसेनेनं वेगळाच मार्ग स्वीकारलाय.

संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्प पुढे करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाला शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेनं सुरू केलाय. बस स्थानक आणि आगारांच्या स्वच्छता मोहिम शुभारंभ कार्यक्रमात तसंच पेपरमधील जाहिरातीत ना मोदींचा फोटो, ना स्वच्छता अभियानाचा लोगो वापरण्यात आला.

संत गाडगेबाबा आणि आर आर पाटील यांचे नाव जोडत स्वच्छता अभियान राज्यात अगोदरपासूनच सुरू असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. यामुळं भाजपला स्वच्छता अभियानाचे श्रेय मिळू नये, यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही राजकीय खेळी खेळलीय. आज स्वच्छता दिन देशभर साजरा होत असतानाही पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाचा एसटी महामंडळाच्या कार्यक्रमात थोडाही नामोल्लेख आलेला नाही. 

एसटी महामंडळाच्या या स्वच्छता प्रकल्पाद्वारे राज्यातील ५३८ बसस्थानके आणि २५० आगार परिसर रोज स्वच्छ ठेवला जाणार आहे. यासाठी वर्षाला १३५ कोटी रुपयांचे कंत्राट एसटी महामंडळाने देण्यात आलंय. 

या संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ कुर्ला नेहरूनगर बस स्थानकात करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.