Tripura violence : 'या' कारणासाठी भाजपने घडवला हिंसाचार, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

त्रिपुरात हिंसाचार, महाराष्ट्रात पडसाद, विविध जिल्ह्यात तणावाचं वातावरण

Updated: Nov 12, 2021, 08:41 PM IST
Tripura violence : 'या' कारणासाठी भाजपने घडवला हिंसाचार, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप title=

मुंबई :  त्रिपुरातील हिंसाचाराच्या  (Tripura Violence) कथित घटनेच्या अफवेनंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ अशा घटना घडत आहेत. मालेगाव (Malegaon), अमरावती (Amravati) आणि नांदेडमध्ये (Nanded) मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. या ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. 

भाजपावर गंभीर आरोप

या घटनेवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. त्रिपुरात ज्या प्रकारचं धोरण किंवा ज्या प्रकारची भूमिका भाजपने घेतली आहे, त्यामुळे ही अशांतता निर्माण होतेय, भाजपाला देशभरात अशाप्रकारची अशांतता, अस्थिरता निर्माण करुन 2024 च्या निवडणूकीत उतरायचं आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

महाराष्ट्रात सदभावना असलेलं सरकार

त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात दगडफेक करण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात सर्व समाज, सर्व धर्म, सर्व जाती यांच्याविषयी सदभावना असलेलं सरकार आहे. त्रिपुरामधल्या परिस्थितीविषयी आम्हालाही चिंता आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

हिंसाचाराचे महाराष्ट्रात पडसाद

त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेचे मालेगावात शुक्रवारी जोरदार पडसाद उमटले. मालेगावपाठोपाठ अमरावती, नांदेड आणि यवतमाळमध्ये देखील हिंसक प्रतिक्रिया उमटल्यात. त्रिपुरात मशीद जाळल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ मालेगावात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक गालबोट लागलं. 

मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करत अनेक दुकानांची तोडफोड केली. त्रिपु-यात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुन्नी जमियतुल उलेमा व रजा अकॅडमी संघटनेतर्फे मालेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला हिंसाचाराचं गालबोट लागलं.